डीजे बंदी : पुण्यापाठोपाठ अहमदनगरमध्येही विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार

बारा मानाच्या गणपती मंडळांचा बहिष्कार

विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यास परवानगी न मिळाल्याने पुण्यापाठोपाठ अहमदनगरमध्येही गणपती मंडळांनी गणपती विसर्जन मिरवणुकीवरच बहिष्कार टाकलाय. डीजेला बंदी केल्याने गणपती विसर्जन मिरवणुकीवर माळीवाड्यातील बारा मानाच्या गणपती मंडळांचा बहिष्कार टाकला आहे. पोलीस प्रशासनाचा निषेध करत थेट गणपती विसर्जन मिरवणुकीवरच बहिष्कार टाकण्यात आला आहे. त्यामुळे आज केवळ मानाचा पहिला गणपती म्हणजे विशाल गणपतीची मिरवणूक निघेल. मात्र त्यानंतर मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या 12 गणेश मंडळांनी मात्र मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.

मिरवणुकीत न्यायालयाच्या आदेशानुसार 75 डेसीबलपेक्षा जास्त आवाज न करण्याचा शब्द या मंडळांनी पोलिसांना दिला. मात्र पोलिसांनी डीजे मिरवणुकीत आणला तर कारवाई करु, असा इशारा गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना दिला. त्यामुळे ऐनवेळी डीजे न वाजवता पारंपरिक वाद्य कुठून आणणार असा प्रश्न गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसमोर उभा राहिला. परिणामी नाराज झालेल्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन हा निर्णय घेतला. पोलीस प्रशासनाचा निषेध करत थेट गणपती विसर्जन मिरवणुकीवरच बहिष्कार टाकण्यात आला.

दुसरीकडे, पुण्यात पोलिसांनी ‘डीजे’ वाजवण्यास परवानगी दिलेली नसली, तरी शहरातील काही मंडळे त्यासाठी डीजे लावण्याच्या मागणीसाठी कोतवाली पोलिस ठाण्यात रात्री ठाण मांडून बसली होती. मोहरमची मिरवणूक विक्रमी कमी वेळेत शांततेत पार पडल्याने जिल्हा पोलीस दलाचे मनोबल उंचावले आहे. जिल्ह्य़ात गणेश विसर्जन मिरवणूक डीजेमुक्त व्हावी यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेची खास पथके नियुक्त केली आहेत.

या पथकाला डीजे सिस्टम जप्त करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी शनिवारी रात्रीपासूनच नगर शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व मार्गाची नाकेबंदी करण्यात आलेली होती. दरम्यान, मिरवणुकीतील शिवसेनेचे मंडळ मिरवणुकीत डीजे वाजवणारच, मात्र त्याचा आवाजाची मर्यादा न्यायालयाच्या निकषांनुसार असेल, असे शिवसेनेचे शहरप्रमुख, नगरसेवक दिलीप सातपुते यांनी सांगितले.

जिल्ह्य़ात ३ हजार २९६ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. त्यात १६८ खासगी आहेत. २ हजार ८३१ मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. नगरचे शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूनम पाटील यांनी सकाळी शहरातील परवानगी मागितलेल्या १५ मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत, त्यांना डीजेमुक्त मिरवणूक काढण्याबरोबरच प्रत्येक मंडळांना विसर्जन मिरवणुकीचे वेळापत्रक ठरवून दिले आहे.

नगरचे ग्रामदैवत विशाल गणेशाच्या उत्सवमूर्तीची सकाळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते उत्थापनाची पूजा होईल. त्यानंतर रामचंद्र खुंटावरून दुपारी १२ वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल, व मिरवणूक पारंपरिक मार्गाने जाईल. नगर शहरातील मिरवणूक मार्गाच्या बंदोबस्ताची जबाबदारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नगर शहराच्या मध्यवर्ती मार्गाबरोबरच सावेडी व केडगावमध्ये स्वतंत्र मिरवणुका निघतील.

४ ड्रोन कॅमेरे व ८ दंडाधिकारी

नगर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी तब्बल १६७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. काही ठिकाणी छुपे कॅमेरेही आहेत. मिरवणूक मार्गावरील इमारतींवर व प्रमुख चौकात ‘वॉच टॉवर’ही उभारण्यात आले आहेत. मिरवणूक मार्गावर ८ कार्यकारी दंडाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. शहरातील ४५० समाजकंटकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. नगर शहराचा बंदोबस्त अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या नियंत्रणाखाली काम करेल. त्यांच्या नेतृत्वाखाली ५ उपअधीक्षक, १५ पोलीस निरीक्षक, ४० सहायक निरीक्षक, १ हजारावर कर्मचारी गृहरक्षक दलाचे २२० जवान, १ हजार ३०० स्वयंसेवक, एसआरपीएफची १ कंपनी, शीघ्र कृती दल १ व धडक कृती दल २ तैनात असतील.

१३ धडक कृती दले

जिल्ह्य़ातील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्ह्य़ा बाहेरहूनही बंदोबस्त मागवण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा त्यावर नियंत्रण ठेवून असतील. याशिवाय जिल्ह्य़ासाठी भारतीय पोलिस प्रशासनातील तीन अतिरिक्त अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. उपअधीक्षक १५, पोलीस निरीक्षक ३८, सहायक निरीक्षक ९२, पोलीस कर्मचारी ४ हजार, गृहरक्षक दलाचे १ हजार जवान, २ हजार ८०० स्वयंसेवक, राज्य राखीव दलाच्या २ कंपन्या, धडक कृती दले ११, शीघ्र कृती दले २, ध्वनिमापक यंत्रे ४२.