प्रभादेवीच्या ब्यू मॉण्ड इमारतीत भीषण आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल

A furious fire at Prabhadevi’s Beau Mound building; Ten firefighting boats have been recovered

मुंबई: प्रभादेवी परिसरातील ब्यू मॉण्ड इमारतीला बुधवारी दुपारी आग लागली. इमारतीच्या 32 आणि 33 व्या मजल्यावर असणाऱ्या ड्युप्लेक्स फ्लॅटमध्ये ही आग लागल्याचे समजते. या इमारतीत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्यासह अनेक उच्चभ्रू व्यक्तींचे फ्लॅट आहेत. या घटनेची वर्दी मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या 10 गाड्या व 3 वॉटर टँकर्स घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या त्यांच्याकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, ही दुसऱ्या श्रेणीची आग असल्याची वर्दी अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत इमारतीमधील 90 ते 95 लोकांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे. अद्यापपर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, ही आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.