औरंगाबादेत ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार

Atrocities on 8-year-old Chimukulli

आजोबाच्या घरात झोपलेल्या ८ वर्षीय चिमुकलीवर परिसरातील एका नराधमाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उस्मानपुरा परिसरातील छोटा मुरलीधरनगर येथे रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.

औरंगाबाद: आजोबाच्या घरात झोपलेल्या ८ वर्षीय चिमुकलीवर परिसरातील एका नराधमाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उस्मानपुरा परिसरातील छोटा मुरलीधरनगर येथे रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. पीडितेच्या आईने आरोपीच्या कानाखाली लगावल्यानंतर आरोपी पसार झाला. आरोपीविरोधात उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

गुड्डू प्रताप रिडलॉन(२२,रा. छोटा मुरलीधरनगर)असे आरोपी नराधमाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिला ही लासुर येथील येथील रहिवासी आहे. तिचे माहेर छोटा मुरलीधरनगर येथे आहे. १५ जुलै रोजी रात्री ८ वर्षीय पीडिता तिची आई आणि बहिणीसह आजोबाला भेटण्यासाठी औरंगाबादेत आली. छोटा मुरलीधरनगरात त्यांनी आजोबाच्या घरी जेवण केले. पिडीतेचे आजोबा शेजारी राहणाऱ्या तिच्या चुलत आजोबाच्या घरी झोपण्यासाठी गेले. त्यानंतर पीडिता, तिची बहिण आणि आई झोपले.

रात्री साडेनऊ ते पावणे दहा वाजेच्या सुमारास पीडितेची आई शौचासाठी शेजारी राहणाऱ्या चुलत्याच्या घरी गेली. तत्पूर्वी त्यांनी मुली झोपलेल्या घराचे दार लोटून घेतले. त्याचवेळी आरोपी गुड्डूने संधी साधली आणि चिमुकली झोपलेल्या घरात तो घुसला. यावेळी त्याने आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. चिमुकली रडू लागली. तेव्हा त्याने तिला धमकावले. त्याचवेळी पीडितेची आई घरी परतली. तेव्हा तिला आरोपी घाणेरड्या अवस्थेत तेथे दिसला. यामुळे त्यांनी लगेच आरोपीला शिव्यांची लाखोळी वाहात त्याच्या  कानशिलात लगावली. त्याला त्या पकडत असताना आरोपी त्यांच्या हाताला झटका देऊन तेथून पसार झाला.  या घटनेनंतर पीडितेने रडतच झालेल्या प्रकाराची माहिती तिच्या आईला दिली. याप्रकरणी पीडितेच्या मातेने लगेच उस्मानपुरा पोलीस ठाणे गाठून आरोपींविरोधात बलात्काराची फिर्याद नोंदविली. बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कलमान्वये पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पसार झालेल्या आरोपीचा पोलीस शोध घेतत आहे.