औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव करणार!-मुख्यमंत्री

औरंगाबादचे संभाजीनगर व उस्मानाबादचे नामकरण धाराशीव करण्याचा निर्णय तत्कालीन शिवसेना-भाजप युतीच्या सरकारने घेतला होता. तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आधीच पाठविण्यात आला आहे. त्याचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून नामांतराचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

औरंगाबादचे संभाजीनगर व उस्मानाबादचे नामकरण धाराशीव करण्याचा निर्णय तत्कालीन शिवसेना-भाजप युतीच्या सरकारने घेतला होता. तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आधीच पाठविण्यात आला आहे. त्याचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून नामांतराचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबादचे अयोध्या असे नामांतर केले. गुजरात सरकारनेही ‘अहमदाबाद’चे कर्णावती करण्याची घोषणा केली. भाजपशासित राज्यांमध्ये नामांतराची मागणी जोर धरत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय करताहेत, असा सवाल करीत शिवसेनेने औरंगाबादचे संभाजीनगर तसेच उस्मानाबादचे नामकरण धाराशीव करा अशी मागणी लावून धरली. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांना तसा सवालच केला. तर शिवसेना नेते रामदास कदम यांनीही नामांतराची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. याबाबत नागपूर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी विचारले असता याविषयी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सिंचन घोटाळय़ातील पवारांचा रोल
सिंचन घोटाळय़ाबाबत त्यांना छेडले असता ते म्हणाले, घोटाळय़ातील आरोपींना शिक्षा होणारच आहे. त्यांच्याविरुद्ध दोन चार्जशीट तयार झाल्या आहेत. सिंचन घोटाळय़ात अजित पवार यांची भूमिका आहे किंवा नाही यावर राज्य सरकार उच्च न्यायालयात भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अवनीप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई
अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अवनीला ठार केले याचे आम्हाला दुःख आहे. नरभक्षक वाघिणीला ठार करण्यासाठी जनतेचा दबाव आल्यानंतर परिस्थिती पाहून तो निर्णय घ्यावा लागतो. मात्र वाघिणीला ठार मारण्याच्या प्रक्रियेत दोष असतील तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल. यात मंत्र्यांचा दोष नसतो, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी वनमंत्र्यांची पाठराखण केली. मनेका गांधी यांनी माझ्या विरोधात टीका केली होती. आम्ही तीही संयमाने घेतली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा करणार आहात, असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजप प्रेम प्रकट करतो
शिवसेनेसोबत आम्हाला युती करायचीच आहे. भाजप-शिवसेना यांचे प्रेम एकतर्फी मुळीच नाही. आम्ही फक्त ते प्रकट करतो, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. शिवसेनेला आपण कोणताही निर्वाणीचा इशारा दिला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आग्रा होणार अग्रवन
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबादचे नाव अयोध्या केल्यानंतर गुजरातमधील भाजप सरकारनेही अहमदाबादचे नाव कर्णावती करणार असे जाहीर केले. पाठोपाठ हैदराबादच्या नामकरणाचीही टूम निघाली. आता तर ऐतिहासिक आग्रा शहराचे नाव बदलून ‘अग्रवन’ ठेवा, अशी मागणी भाजप आमदार जगनप्रसाद गर्ग यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना पत्र पाठवून केली आहे.