भय्युजी महाराजांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा, काँग्रेसची मागणी !

CBI probe into Bhayyuji’s death, Congress demand

काँग्रेसकडून मृत्यूच्या सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. भाजपाने काही कामे त्यांच्यावर सोपवली होती आणि त्याचमुळे ते तणावात होते असेही काँग्रेसने म्हटले आहे

राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांनी आज दुपारी इंदूर येथील त्यांच्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. या बातमीने सगळे राजकीय वर्तुळच हादरले आहे. अनेक दिग्गज नेते त्यांचे शिष्य होते. माझ्यावर असलेला तणाव सहन न झाल्याने मी आत्महत्या करतो आहे असे लिहिलेली सुसाइड नोटही मिळाली आहे. अशात भय्युजी महाराजांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. भय्युजी महाराज यांच्यावर भाजपाने बरीच कामे सोपवली होती. ती पूर्ण करून घेण्यासाठी सारखा पाठपुरावा केला जात होता. त्याचमुळे भय्युजी महाराज तणावात होते असा आरोप काँग्रेसने केला आहे.

मध्यप्रदेशातील शिवराज सिंह सरकारने आम्ही तुम्हाला सगळ्या सुविधा पुरवतो तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या अशी मागणी केली होती. या मागणीमुळे भय्युजी महाराज तणावाखाली होते असा आरोप काँग्रेस नेते मानक अग्रवाल यांनी केला. त्याचमुळे त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येते आहे.

संत भय्युजी महाराज यांच्या निधनाच्या बातमीमुळे काँग्रेस पक्षातील प्रत्येकाला अतीव दुःख झाल्याचेही ट्विट करण्यात आले आहे. भय्युजी महाराजांनी आपले सगळे आयुष्य समाज सेवेसाठी वेचले. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो असेही या ट्विटमध्ये म्हटले आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. देशातले संस्कृती, ज्ञान आणि समाजसेवा जपणारे व्यक्तीमत्त्व हरपले आहे. त्यांचे विचार कायमच प्रेरणा देत राहतील असेही त्यांनी म्हटले आहे.

भय्युजी महाराज यांना अनेक राजकारणी राजकीय गुरु मानत होते. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा छंद होता. स्वच्छता अभियान असेल किंवा इतर सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग घेतला जात होता. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते त्यांचा राजकीय सल्ला घेत होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्जबाजारी झाले होते अशीही माहिती समोर येते आहे.