माऊलींच्या अश्वाचे हदयविकाराच्या झटक्याने निधन.

Death of Mauli Ashwah

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत असणाऱ्या जोडीतील एक पांढऱ्या रंगाचा अश्व हिरा याचे निधन.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजाच्या पालख्या पुणे शहरात कालपासून मुक्कामासाठी असून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत असणाऱ्या जोडीतील एक पांढऱ्या रंगाचा अश्व हिरा याचे रास्ता पेठेतील रास्तेवाडा येथे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडली. गेल्या आठ वर्षापासून हा अश्व माऊलींच्या वारीत सेवा देत होता. वारीच्या वाटेवरच अश्वाने अखेरचा श्वास घेतला. ही वार्ता पसरताच वारक-यांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संत तुकाराम महाराजाची पालखी आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्याचे काल सायंकाळच्या सुमारास पुणे शहरात आगमन झाले होते. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे संत तुकाराम महाराजांची पालखी भवानी पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिराच्या मुक्कामी ठिकाणी मार्गस्थ झाले. यातील ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखीचा पांढऱ्या रंगाचा अश्व हिरा यास रास्ता पेठेतील रास्तेवाडा येथे विश्रांतीसाठी घेऊन जाण्यात आले. मात्र, आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हिरा या अश्वास ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने जागीच निधन झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे वारकरी भाविकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पालखी सोहळा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन अश्वाचे वारीसाठी त्वरीत आगमन होणार आहे.