भय्युजी महाराजांचं अखेरचं ट्विट पाहिलंत का?

भय्युजी महाराज यांनी आत्महत्या केल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. इंदूर येथे आपल्या राहत्या घरी स्वत:ला गोळी झाडून घेत त्यांनी आत्महत्या केली. भय्युजी महाराज हे अध्यात्मिक गुरु म्हणून प्रसिद्ध होते. सोशल मीडियावरही ते मोठ्या प्रमाणात अॅक्टीव्ह होते. त्यांनी शेवटचे ट्विट काही वेळापूर्वी म्हणजे १ वाजून २७ मिनिटांनी केले होते. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात त्यांनी स्वत:वर गोळी झाडली. या ट्विटमध्ये त्यांनी आपल्या भक्तांना मासिक शिवरात्रीचा अर्थ सांगत शुभेच्छा दिल्या होत्या. इंदूरमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचे बॉम्बे रुग्णालयाने जाहीर केले आहे. त्यामुळे हे ट्विट त्यांचे अखेरचे ट्विट ठरले आहे.

 

Did you see the last tweet of Bhayyuji Maharaj?

आपल्या ट्विटमध्ये भय्युजी महाराज म्हणतात, ”मासिक शिवरात्रीला महाशिवरात्रीही म्हणतात. या पवित्र दिवसाच्या शुभेच्छा मी माझ्या सर्व भक्तांना देतो.” या ट्विटखाली कमेंटमध्ये त्यांनी शिवरात्रीबाबत आणखी काही माहितीही दिली आहे. याबरोबरच ट्विटमध्ये शंकराबरोबरचा आपला एक फोटोही त्यांनी अपलोड केला आहे. त्यामध्ये संस्कृतमध्ये एक श्लोकही लिहीण्यात आला आहे. साधारण अर्धा ते एक तासात असे काय झाले की या ट्विटनंतर भय्युजी महाराजांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असे प्रश्न नेटीझन्स विचारत आहेत. अनेकांनी त्यांचे हे ट्विट रिट्विट तसेच लाईकही केले आहे.


त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता आणि दिवाळखोरीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असं सांगण्यात येत आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते त्यांचा राजकीय सल्ला घेत होते. भय्युजी महाराज यांनी असे पाऊल का उचलले याचे नेमके कारण समोर येऊ शकलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी राजकारणातलाही सहभाग कमी केला होता. काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. भय्युजी महाराज यांच्या आश्रमात अनेक व्हीआयपी व्यक्ती येत असत. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत.