पवार यांच्यासमवेत मैत्रीचे गुपित उपराष्ट्रपतींनी उलगडले

वेंकय्या नायडू यांनी शरद पवार यांच्याशी असलेल्या स्नेहबंधाचे गुपित शुक्रवारी उलगडले. 

महा नुज्य  नेटवर्क बारामती :- राजकीय जीवनाच्या प्रारंभापासूनच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी माझा स्नेह आहे. आमचे राजकीय विचार वेगळे असले ग्रामीण विकासाबाबत प्रेम, व्यावहारिक दृष्टिकोन आणि सतत ज्ञान संपादन करण्याची त्यांची सवय यामुळे आमची मैत्री कायमच राहिली, अशा शब्दांत उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी शरद पवार यांच्याशी असलेल्या स्नेहबंधाचे गुपित शुक्रवारी उलगडले.

उपराष्ट्रपती झाल्यानंतर प्रथमच बारामतीला आलेल्या नायडू यांनी गेल्या चार दशकांपासूनच्या राजकीय प्रवासात आमचे पक्ष वेगळे असले तरी स्नेहबंध कायमच राहिल्याचे स्पष्ट केले. पवार यांच्या ग्रामीण विकासाच्या कामाची माहिती प्रत्येक खासदाराने बारामतीत येऊन घ्यायला हवी, असेही त्यांनी सांगितले. पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीचा झालेला सर्वागीण विकास पाहून मी प्रभावित झालो.

विद्या प्रतिष्ठान आणि कृषी विज्ञान केंद्रासारख्या संस्थांच्या माध्यमातून या भागाचा झालेला कायापालट हा सामान्य माणसाच्या जीवनात आनंद फुलविणारा असल्याचे नायडू यांनी सांगितले.

पालकमंत्री गिरीश बापट , खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार , जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, बारामतीच्या नगराध्यक्षा पौणिमा तावरे, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र पवार, भीमथडी जत्रेच्या सुनंदा पवार, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अशोक प्रभुणे, सचिव द.रा.उंडे, खजिनदार रमणिक मोता या वेळी उपस्थित होते.

नीती आयोगाकडून शेतीशी निगडित उद्योग उभारणीसाठी कृषि महाविद्यालयास मंजूर झालेल्या राज्यातील पहिल्या अटल इन्क्युबेशन सेंटर आणि अटल टिंकरिंग लॅबच्या विद्यार्थ्यांशी नायडू यांनी संवाद साधला. संस्थेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध उपकरणांची माहिती त्यांनी जाणून घेतली.

टाकाऊतून खेळणी, पवनचक्की, आविष्कार स्वच्छता यंत्र, चरख्यातून वीजनिर्मिती, ऑब्स्टॅकल अ‍ॅव्हॉयडर, ऑटोमॅटिक रेन अलार्म सिस्टीम, थ्रीडी प्रिंटर, गॅस सुरक्षा यंत्र, कम्युनिकेशन ऑफ डिव्हाईसेस युजींग वायफाय, टच सेन्सर अशा विविध उपकरणांची नायडू यांनी पाहणी केली. नेदरलँड एज्युकेशन प्रोग्राम, सीबीई बेस्ड एज्युकेशनल थिम्सची माहिती घेतली. अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट,  बारामती कृषी महाविद्यालय आणि शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी  तसेच पीक उत्पादकता वाढीसाठी तयार केलेल्या उत्पादनांची माहिती नायडू यांनी घेतली.