भविष्यात तलवार हातात घ्यावीच लागेल- संभाजी भिडे

In future, the sword will have to be taken in hand – Sambhaji Bhide

अहमदनगर:– रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासनाच्या रक्षणासाठी ‘हिंदवी स्वराज्य खडा पहारा’ तुकडी तयार करण्याची घोषणा श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केले. ते रविवारी अहमदनगरच्या टिळक रोड येथील सभेत बोलत होते. या सभेला परवानगी द्यायला आंबेडकरी संघटनांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे आज कडकोट बंदोबस्तात ही सभा पार पडली.

यावेळी संभाजी भिडे यांनी रायगडावर उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या सुवर्ण सिंहासनाच्या रक्षणासाठी श्री शिवप्रतिष्ठाकडून हिंदवी स्वराज्य खडा पहारा ही तुकडी तैनात केली जाईल. यामध्ये दोन हजार धारकऱ्यांचा समावेश असेल व ते रोज गडावर पहारा देतील.

सिंहासनाच्या रक्षणासाठी खरे तर या धारकऱ्यांच्या हाती तलवारी असायला पाहिजे होत्या. मात्र, त्यावरून लगेच लोकशाही वाचवण्याचा टाहो फुटेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर हे काय चालू आहे, म्हणून टीका करतील. त्यामुळे तुर्तास याठिकाणी धारकरी काठ्याच घेऊन जातील. परंतु, भविष्यात त्यांच्यावर तलवारी हातात घेऊन जाण्याची वेळ नक्कीच येणार आहे, असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले. याशिवाय, अहमदनगरचा उल्लेख ‘अहमदनगर’ नव्हे तर ‘अंबिकानगर’ असा करण्याचे आवाहन त्यांनी केले. नगर शहराच्या नामांतराचा प्रस्तावच त्यांनी सभेत मांडला.