‘आधी हिंदू धर्म स्विकारा’, पासपोर्ट कार्यालायात हिंदू-मुस्लिम दांपत्याचा अपमान.

केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि प्रधानमंत्री कार्यालयाला ट्विट करत दांपत्याने तक्रार केली आहे

Insult to Hindu-Muslim couple in passport office

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत एका महिलेने पासपोर्ट कार्यालयात धर्माच्या नावाखाली अपमान केल्याचा आरोप लगावला आहे. एका मुस्लिम व्यक्तीशी लग्न केलं असल्याने आपला अपमान करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला असून त्यांनी यासंबंधी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि प्रधानमंत्री कार्यालयाला ट्विट करत तक्रार केली आहे. बुधवारी पासपोर्ट कार्यालयात प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला.

मोहम्मद अनस सिद्दीकी आणि त्यांची पत्नी तन्वी सेठ यांनी आरोप केला आहे की, पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी विकास मिश्रा याने अनस सिद्दीकी यांना धर्मांतर करण्यास सांगितलं. इतकंच नाही तर तन्वी यांना सर्व कागदपत्रांवर आपलं नाव बदलण्यासही सांगितलं. जेव्हा त्यांनी नकार दिला तेव्हा त्याने त्यांच्यावर आरडाओरड सुरु केली. या वागणुकीमुळे धक्का बसलेल्या दांपत्याने सुषमा स्वराज यांच्याकडे तक्रार करत मध्यस्थी करण्याची मागणी केली आहे.

अनस आणि तन्वी यांचं २००७ मध्ये लग्न झालं आहे. त्यांनी सहा वर्षाची मुलगी आहे. दोघेही नोएडा येथे एका खासगी कंपनीत काम करतात. १० जून रोजी एका कामानिमित्त ते लखनऊला गेले होते.

‘तन्वी आणि मी १९ जून रोजी पासपोर्टसाठी अर्ज केला होता. लखनऊमधील पासपोर्ट सेवा केंद्रात बुधवारी आम्हाला बोलावलं होतं. पहिले दोन टप्पे पार केल्यानंतर औपचारिकता पुर्ण करण्यासाठी आम्हाला सी काऊंटवर पाठवण्यात आलं’, अशी माहिती अनस यांनी दिली आहे.

‘तन्वीला पहिलं बोलावण्यात आलं. त्यावेळी सी काऊंटवर विकास मिश्रा नावाच अधिकारी होता. त्याने तिची कागदपत्रं तपासली. जेव्हा त्याने पतीच्या नावाच्या येथे माझं नाव वाचलं तेव्हा त्याने तिला नाव बदला अन्यथा तुमचा अर्ज फेटाळण्यात येईल असं सांगितलं. जेव्हा तन्वीने नकार दिला तेव्हा त्याने सर्वांसमोर तिला ओरडण्यास सुरुवात केली. जेव्हा तन्वी रडू लागली तेव्हा त्याने तिला सहाय्यक पासपोर्ट अधिकाऱ्याकडे पाठवलं’, अशी माहिती अनस यांनी दिली आहे.

‘यानंतर त्याने मला बोलावलं आणि अपमान करण्यास सुरुवात केली. त्याने मला हिंदू धर्म स्विकारा अन्यथा तुमचा विवाह मान्य करु शकत नाही असं सांगितलं. जेव्हा आम्ही सहाय्यक पासपोर्ट अधिकाऱ्याकडे तक्रार केली तेव्हा त्याने विकास मिश्रा अनेकदा अशाप्रकारे गैरवर्तवणूक करत असल्याचं सांगितलं. त्यांनी दुसऱ्या दिवशी या, तुमची समस्या सोडवू असं आश्वासन दिलं’, असं अनस यांनी सांगितलं आहे.

प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी पियूष वर्मा यांनी दांपत्याचा अर्ज फेटाळण्यात आला नसल्याची माहिती दिली असून, सर्व कागदपत्रांची तपासणी करत आरोपांची चौकशी केली जाईल असं सांगितलं आहे.