JEE चा निकाल जाहीर; प्रणव गोयल देशात पहिला

JEE result declared; Pranav Goyal is the first in the country

मुंबई:-आयआयटी आणि एनआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला. या परीक्षेत हरियाणाच्या प्रणव गोयलने ३६० पैकी ३३७ गुण मिळवत देशातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तर महाराष्ट्रातून ऋषी अग्रवाल हा पहिला आला आहे. यंदा देशभरातून १,५५,१५८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी १८ हजार १३८ विद्यार्थी पास झाले आहेत. परीक्षार्थींना  जेईईच्या jeeadv.ac.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.

२० मे रोजी आयआयटी कानपूरच्या वतीने देशभरातील विविध केंद्रांवर हा परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत एकूण १६०६२ विद्यार्थी आणि २०७६ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. सर्वसाधारण गटातील ८७९४, ओबीसी प्रवर्गातून ३१४०, अनुसूचित जातींमधून ४७०९ आणि अनुसूचित जमातींमधून १४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींमध्ये कोटा येथील मीनल पारेख पहिली आली असून देशातून सहावी आली आहे. तिला ३६० पैकी ३१८ गुण मिळाले आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर आता १५ जूनपासून जागा वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे. गेल्या वर्षी आयआयटी मद्रासकडून देशभरातील विविध केंद्रांवर हा परीक्षा घेण्यात आली होती. त्यावेळी ५० हजार ४५५ जण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले होते.