अहमदनगरमध्ये क्रिकेट खेळताना बाद केल्याच्या रागातून गोलंदाजावर चाकूने वार

Knock down the bowler in Ahmednagar after being dismissed while playing cricket

क्रिकेटच्या सामन्यात बाद केल्याचा राग येऊन एका तरुणाने प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रात्री फारशी वर्दळ नसल्याने शहरातील अनेक भागांमध्ये रात्री रस्त्यांवरच क्रिकेटचे सामने रंगतात.  रविवारी रात्री असाच एक सामना अहमदनगरमधील माळीवाडा भागातील सिवम प्लाझा या चित्रपटगृहासमोर सुरु होता. विशाल हुच्चे (वय २५ वर्ष) या तरुणाने टाकलेल्या चेंडूवर वैभव लंगोटे हा फलंदाज बाद झाला. यामुळे वैभवचा पारा चढला. त्याने थेट चाकू बाहेर काढला आणि विशालवर वार केले. भररस्त्यात अन्य खेळाडूंच्या डोळ्यादेखत ही घटना घडली. मात्र, वैभवकडे चाकू असल्याने कोणीही विशालच्या मदतीला आले नाही.

गंभीर जखमी झालेल्या विशालला वैभवने ठार मारण्याची धमकी दिली आणि तिथून निघून गेला. यानंतर विशालला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी विशालने सोमवारी पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून पोलिसांनी वैभवविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला आहे.