तीन वर्षांच्या मुलीला नदीत फेकून लेस्बियन कपलची आत्महत्या

Lesbian Couple commits suicide after throwing a three-year-old daughter into the river

अहमदाबादमध्ये लेस्बियन कपलने नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. आत्महत्येपूर्वी यातील एका महिलेने तिच्या तीन वर्षांच्या मुलीलाही नदीत फेकले. ‘हे जग आम्हाला एकत्र येऊ देणार नाही. त्यामुळेच आम्ही आत्महत्या करत आहोत’, असे या महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

आशा ठाकोर (वय ३०), भावना ठाकोर (वय २८) या अहमदाबाद जिल्ह्यातील राजोदा गावातील एका खासगी कंपनीत नोकरीला होत्या. दोघीही विवाहित असून दोघींची लग्नानंतर ओळख झाली. हळूहळू ओळख वाढली आणि दोघींमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघींच्या कुटुंबीयांना समलैंगिक संबंधांविषयी समजले होते, असे पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले. यामुळे दोघींही तणावाखाली होत्या.

सोमवारी सकाळी भावना, आशा, तिची तीन वर्षांच्या मुलगी मेघासह अहमदाबादमधील साबरमती नदीवरील पुलावर आल्या. आधी आशाने तिच्या मुलीला नदीत फेकले. यानंतर त्यांनी दुपट्ट्याने बांधून घेतले आणि नदीत उडी मारली. आत्महत्येपूर्वी त्यांनी ब्रिजजवळ दगडाखाली सुसाईड नोटही ठेवली. ‘हे जग आम्हाला कधीच एकत्र येऊ देणार नाही. म्हणून आम्ही आत्महत्या करत आहोत’ असे त्यांनी या नोटमध्ये म्हटले आहे.