शरद पवारांपासून महाराष्ट्राने सावध राहावे- उद्धव ठाकरेंचे समानातून टीकास्त्र

Maharashtra should beware of Sharad Pawar: Uddhav Thackeray

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुणेरी पगडीऐवजी आता फक्त फुले पगडीचा वापर करायचा, असा आदेश देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घणाघाती टीका केली आहे.  ”शरद पवारांचे भान सुटले आहे किंवा त्यांचा आत्मविश्वास डळमळला आहे. कोरेगाव-भीमा दंगलीनंतर पवार पक्षाच्या राष्ट्रवादीला नवा जातीय सूर सापडला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने सावध राहायला हवे.’’ असे सामनामध्ये म्‍हटले आहे.

‘एक पगडी राजकारण’ या मथळ्याखाली सामनामध्ये अग्रलेख लिहिला आहे. त्‍यात म्‍हटले आहे की, ‘‘ उत्तर प्रदेशातील मुझफ्फरपूर, कैराना येथील धार्मिक दंगलीनी मतांचे धार्मिक ध्रुवीकरण केले. महाराष्ट्रात जातीय ध्रुवीकरण करण्याचे अचाट प्रयत्न सुरू आहेत. शरद पवार यांनी आता जे एक‘पगडी’ राजकारण सुरू केले आहे ते महाराष्ट्रासाठी घातक आहे एवढे आम्ही निश्चितपणे सांगू शकतो”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले आहे.

‘राष्ट्रवादीच्या स्थापना मेळाव्यात शरद पवार यांनी मन मोकळे केले आहे. मन मोकळे करण्यासाठी त्यांनी विषय निवडला आहे तो कोरेगाव-भीमा दंगलीचा. या प्रकरणाशी ज्यांचा संबंध नाही त्यांच्यावर सरकार कारवाई करीत असल्याचे मत पवारांनी व्यक्त केले आहे. कोरेगाव भीमाचे उद्योग नक्की कुणाचे हे सगळय़ांना ठाऊक असल्याची पुडीदेखील पवारांनी सोडली आहे. कोरेगाव-भीमा दंगलीने महाराष्ट्र होरपळून निघाला होता. दलित संघटनांनी सर्वत्र जाळपोळी करूनही महाराष्ट्रातील इतर वर्गाने संयम राखला त्याचे अनेकांना वाईट वाटले. जातीयवादी नेत्यांच्या चिथावणीखोरीस ‘मराठी’ जनता बळी पडली नाही. यालाच महाराष्ट्रीयपण म्हणावे लागेल. राहुल फटांगडे या तरुणाची हत्या झाली व त्याचे आरोपीही सापडले आहेत. थोडा वेळ लागला, पण पोलिसांनी काम केले आहे. दंगलीमागे शहरी नक्षलवाद होताच व त्याचे धागेदोरे हाती लागले आहेत. मोदी यांच्या हत्येच्या कटाचा सुगावा याच तपासात लागला, पण त्यावर भाष्य करणे योग्य नाही. दंगलीमागचे जे सूत्रधार पकडले गेले त्यांचा दंगलीशी संबंध नाही असे लोक पकडले गेलेत. पवार असे सांगतात ते कशाच्या आधारावर? श्री. शरद पवार, प्रकाश आंबेडकर वगैरे नेत्यांनी तपास भरकटून टाकण्याचा विडा उचलला आहे काय? असा प्रश्न सामनातून विचारण्यात आला आहे.