नागपूर पवनकर हत्याकांड: ‘तो माणूस नाही, सैतान आहे, घात करेल’

Nagpur Pavankar massacre: ‘He is not a man, Satan is going to kill’

नागपूर: तो माणूस नाही, सैतान आहे, घात करेल, त्याला घरापासून दूरच ठेवा.. हा इशारा होता, वृद्ध मीराबाई पवनकर यांचा. क्रूरकर्मा विवेक पालटकर याने आपल्या घरी येऊ नये, कुटुंबियांनी त्याच्यासोबत संबंध ठेवू नये, म्हणून मीराबाईने अखेरपर्यंत जीवाचा आटापिटा केला होता. मात्र मीराबाईंच्या बोलण्याला कुटुंबियांनी किंमत दिली नाही. त्यांचा इशारा दुर्लक्षित केला. परिणामी आक्रित घडले. विवेक पालटकरने मीराबाईंसह तिचे अवघे कुटुंबच संपविले.
पवनकर कुटुंबीयांच्या हत्याकांडाच्या रूपाने नागपूरच्या इतिहासात वेगळी रक्तरंजित नोंद करणारी ही थरारक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. त्यानंतर या प्रकरणाशी जुळलेले अनेक पैलू हळूहळू पुढे आले. त्यातीलच हा एक पैलू आहे. कुटुंबाचा आधारवड असलेल्या ज्येष्ठांच्या अनुभवी शब्दांना सध्या महत्त्व दिले जात नाही. त्यांचे शब्द, सल्ला अन् इशारे याकडे दुर्लक्ष केल्यास किती भयंकर दुष्परिणाम होऊ शकतात, त्याचे हे दुर्दैवी उदाहरण ठरावे.

काय आहे ही घटना?
नागपुरातील नंदनवन भागात असलेल्या आराधनानगर येथे विवेक पालटकर याने आपल्या पोटच्या मुलासह सख्खी बहीण, जावई, त्यांची आई व मुलगी अशा पाच जणांचा रविवारी मध्यरात्री बत्त्याने प्रहार करून निर्घृण खून केला. त्या घरात दुसऱ्या खोलीत झोपलेली आरोपीची एक मुलगी व जावयाची मुलगी अशा दोनच लहान मुली या खुनी हल्ल्यातून बचावल्या आहेत.

हिंसक वृत्तीने केले आयुष्य उध्वस्त
क्रूरकर्मा पालटकरचे नाव विवेक असले तरी त्याच्या वागण्याबोलण्यात कसलाही विवेक नाही. खुनशी वृत्ती, आपलपोटेपणा, आळशी, संशयी अन् विश्वासघातकी स्वभावाच्या विवेकहीन पालटकरची मौदा तालुक्यातील नवरगावात १० एकर शेती आहे. ती कसण्याऐवजी आयते खाऊन तो गावात उनाडक्या करीत होता. त्यामुळे कुटुंबीयांनी आठ वर्षांपूर्वी त्याचे लग्न लावून दिले.
लग्नानंतर जबाबदारी कळेल अन् तो सुधरेल, असा कुटुंबीयांचा भाबडा विश्वास होता. मात्र, झाले भलतेच. तो अधिकच अविवेकी झाला. त्याने पत्नी सविताला छळणे सुरू केले. पहिल्यांदा मुलगी झाली म्हणून छळ, तर नंतर पत्नी चारित्र्यहीन आहे, असे म्हणून तो छळू लागला. दरम्यान, पत्नीने गोंडस मुलाला जन्म दिला. तो मुलगाच आपला नाही, म्हणत पालटकरने सहा महिन्यानंतर २४ मे २०१४ ला पत्नीची हत्या केली अन् भर रस्त्यावरच तिला जाळून टाकले. या घटनेनंतर वृद्ध मीराबाई पवनकर यांच्या डोळस वृत्तीने पालटकरमधील क्रूरकर्मा हेरला. या नराधमाची सावली आपल्या कुटुंबीयांवरच काय, घरावरही पडू नये म्हणून त्या सतर्कता दाखवू लागल्या. धडपडू लागल्या.
विवेकहीन पालटकरची बहीण अर्चना ही मीराबार्इंची सून. सख्खा लहान भाऊ म्हणून पालटकर याच्यावर अर्चनाचा खूप जीव. तिचाच नव्हे तर तिचे पती कमलाकर पवनकर यांचाही साळा (मेव्हणा) पालटकरवर जीव होता. त्याचमुळे आई मीराबाईच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून कमलाकरने चार वर्षांपूर्वी आईवडिलांच्या सावलीपासून पोरकी झालेली विवेकची मुलगी मिताली अन् मुलगा कृष्णा या चिमुकल्यांना आपल्या घरी आणले. त्यांना पोटच्या मुलांसारखे वाढवले. एवढेच काय, न्यायालयाने पालटकरच्या कृत्याबद्दल त्याला शिक्षा सुनावून कारागृहात डांबण्याचे आदेश दिल्यानंतर कमलाकर यांनी त्याला कारागृहातून बाहेर आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. अखेर तीन महिन्यांपूर्वी हा नराधम कारागृहाबाहेर आला. त्याच्या वृत्तीत सकारात्मक फरक पडण्याऐवजी तो जास्तच वाईट झाला. वडिलांची शेती कसण्याऐवजी तो वेळीअवेळी बहिणीच्या घरी येऊन खाऊ लागला. सीताबर्डीतील एका सावजी भोजनालयात त्याने काही दिवस काम केले. मात्र, तेथेही पगारासाठी कुरबूर करून त्याने पगाराचे पैसे उचलताच काम सोडले.
न्यायालयीन कामात खर्च झालेली पाच लाखांची रक्कम जावयाने परत मागितली असता तो खेकसू लागला. जावई कमलाकरच नव्हे तर बहीण अर्चनाशी तो उलटून बोलू लागला. त्यामुळे वृद्ध मीराबाईला तो जास्तच खटकू लागला. तो माणूस नाही, सैतान आहे. तो घात करेल, त्याला घरापासून दूरच ठेवा, असे त्या कमलाकर आणि सून अर्चनाला सांगू लागल्या. मात्र, त्यांच्या या इशाºयाला मुलगा आणि सुनेने कवडीची किंमत दिली नाही. उलट अर्चना आणि मीराबाई विसंवाद वाढला. त्यांच्यात विवेकच्या येण्या-जाण्यावरून नेहमी वाद होऊ लागले. रविवारी रात्री असेच झाले. क्रूरकर्मा पालटकरने कमलाकरच्या घरात पाय ठेवताच घरात कुरबूर सुरू झाली अन् अखेर पवनकर कुटुंबांतील चौघांना संपवूनच ही कटकट संपली. मीराबाईचे शब्द, त्यांचा इशारा खरा ठरला. पालटकरमधील सैतान त्यांनी आधीच हेरला होता, हेदेखील या थरारकांडातून अधोरेखित केले.

ज्याचा संसार बसविण्याचा प्रयत्न, त्याने घरच उध्वस्त केले!
कारागृहातून विवेकहीन मेव्हण्याला बाहेर काढल्यानंतर त्याचे दुसरे लग्न करून द्यावे, त्याचा संसार पुन्हा व्यवस्थित बसवावा म्हणून कमलाकरचे प्रयत्न होते. कमलाकर सर्ववर्ग कलार समाजाचे पदाधिकारी होते. त्यांनी आपल्या समाजातील अनेकांकडे मेव्हण्याच्या लग्नासाठी मुलगी किंवा निराधार महिला किंवा विधवा तरी शोधा, असा शब्द टाकला होता. विवेकच्या दुसºया बायकोने मुलांचा सांभाळ केला नाही तर मी सांभाळेन त्यांना, अशी हमीही कमलाकर देत होते. कसेही करून त्याचा संसार पुन्हा बसविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, क्रूरकर्मा विवेकने कमलाकरचेच घर उद्ध्वस्त केले.

नराधम कसा पळाला ?
हत्याकांड उजेडात येऊन १५ तासांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मात्र, नराधम विवेक पालटकर घटनास्थळावरून कुठे आणि कसा पळला, ते स्पष्ट होऊ शकले नाही. त्याने आपली मोटरसायकल बहिणीच्या घरीच ठेवली. त्यामुळे तो कशाने पळाला, त्याला कुणी पळण्यासाठी मदत केली का, असे अनेक प्रश्न चर्चेला आले आहे. या प्रश्नांची उत्तरे नराधम पालटकरच्या अटकेनंतरच मिळणार आहेत. दरम्यान, नंदनवन पोलीस ठाण्यात कमलाकर यांचा भाऊ केशव मारोतराव पवनकर (वय ३८) यांच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. नंदनवन पोलीस आणि गुन्हेशाखेसह वेगवेगळी ७ ते १० पोलीस पथके त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, सायंकाळी पाचही मृतांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.