अकबर आणि महान सम्राट…, छे छे, काहीतरीच काय?; महाराणा प्रताप हेच श्रेष्ठ- योगी आदित्यनाथ

 national mughal-emperor akbar was not great only maharana pratap was yogi adityanath ?utm source notification

लखनऊ: अकबराला महान सम्राट वैगैरे म्हणणे ही अतिशयोक्ती ठरेल. महाराणा प्रताप हेच 16 व्या शतकातील महान सम्राट होते, असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  यांनी केले. ते गुरुवारी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी महाराणा प्रताप यांची प्रशंसा करताना म्हटले की, 1576 साली हळदीघाट येथील लढाईत कोण जिंकले किंवा हरले, हे महत्त्वाचे नाही. याउलट स्वाभिमानी महाराणा प्रताप यांनी अरवलीच्या पर्वतरांगांमध्ये अनेक वर्षे अकबराच्या सैन्याशी लढा दिला.

चिकाटीने लढून सर्व किल्ले परत मिळवले. तुम्ही माझे सम्राटपद मान्य करा, मी कधीच मेवाडमध्ये फिरकणार नाही, असा प्रस्ताव अकबराने महाराणा प्रतापांसमोर ठेवला होता. जयपूरच्या महाराज मानसिंग यांनीदेखील त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महाराणा प्रतापांनी अकबराचे सम्राटपद कधीच मान्य केले नाही. मी तुर्कांवर कधीच विश्वास ठेवणार नाही, असे त्यांनी अकबराला ठणकावून सांगितल्याचा इतिहास योगींनी उपस्थितांसमोर मांडला.

त्याकाळी अनेक राजांनी आपला स्वाभिमान गहाण टाकून अकबराचे सम्राटपद मान्य केले. मात्र, महाराणा प्रताप त्याला अपवाद ठरले. त्यांचे हे विचार आजच्या काळातही लागू पडतात. सध्या काही लोक वैयक्तिक स्वार्थापायी स्वत:चा समाज, संस्कृती आणि देशातील वातावरण गढूळ करायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सर्वांचे नुकसान होत आहे. यावेळी योगी आदित्यनाथांनी अनुसूचित जाती-जमाती आणि मागासवर्गीयांना आवाहन केले की, तुम्ही स्वत:ला महाराणा प्रतापांचे वंशज समजा. याच सर्व लोकांच्या पाठिंब्यामुळे महाराणा प्रताप इतके महान राजे ठरले. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीमध्येही त्यांनी अकबराच्या सैन्याशी लढा दिला आणि ते शेवटपर्यंत शत्रूच्या हाताला लागले नाहीत, असे योगींनी सांगितले.