सिडको सर्वसामान्यांसाठी बांधणार १४ हजार ८३८ घरे, आजपासून ऑनलाइन नोंदणी सुरु

Online registration from today, 14 thousand 838 houses by creating CIDCO

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी सोडत योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे.

महा न्यूज नेटवर्क : सर्वसामान्यांना परवडतील अशी १४ हजार ८३८ घरे सिडकोतर्फे साकारणार असून त्यांची ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी सोडत योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे.

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा करताना सांगितले की, सिडको गृहनिर्माण योजने अंतर्गत कळंबोली, तळोजा , खारघर , घणसोली आणि द्रोणागिरी या पाच ठिकाणी  असलेल्या ११ नोडमध्ये ही घरे उभारली जात आहेत. ही सर्व घरे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल आणि अल्पउत्पन्न गटातील लोकांसाठी असून प्रधानमंत्री आवास योजना आणि सी.एल.एस.एस. योजनेंतर्गत समाविष्ट आहेत. या महागृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत दोन ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.

या योजनेत एकूण १४ हजार ८३८ घरांपैकी पाच हजार २६२ सदनिका आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील नागरिकांसाठी आहेत. तर नऊ हजार ५७६ सदनिका अल्प उत्पन्न घटकातील नागरिकांसाठी आहेत.

ज्या इच्छुक अर्जदारांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अर्ज करायचा आहे त्यांनी प्रधान मंत्री आवास योजना पोर्टल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था पोर्टलवर, जसे नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महापालिका किंवा म्हाडा यांच्यापकी कोणत्याही एका वेब पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या अर्जदारांनी यापूर्वीच नोंदणी केली आहे त्यांनी पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अर्ज केलेल्या अत्यल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना घर प्राप्त झाल्यास एकूण अडीच लाख रूपयांचे अनुदान मिळणार आहे तर सी.एल.एस.एस. च्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील घर प्राप्त होणाऱ्या लाभार्थ्यांना रू.दोन लाख ६७ हजार रुपयांचे व्याज अनुदान प्राप्त होणार आहे.

महत्वाचे दिनांक :

ही योजना सिडकोच्या संकेतस्थळावर दिनांक १३ ऑगस्टपासून सुरू होणार असून प्रत्यक्षात अर्ज नोंदणीची कार्यवाही १५ ऑगस्ट दुपारी दोन वाजल्यापासून सुरू होणार आहे. नोंदणीकृत अर्जदार या योजनेत दिनांक १६ सप्टेंबर  रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज दाखल करू शकतात. तर अनामत रक्कम आणि अर्जाचे शुल्क ऑनलाइन भरण्याची मुदत दिनांक १५ऑगस्ट ते १७ सप्टेंबर पर्यंत आहे. सिडकोच्या https://lottery.cidcoindia.com या संकेत स्थळावर योजनेच्या प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे.

आर्थिकदृष्टय़ा दुर्बल..

  • ज्यांचे सरासरी कौटुंबिक मासिक उत्पन्न २५ हजार आहे.
  • अनामत रक्कम ५ हजार रुपये.
  • अर्जाचे शुल्क २८० रुपये.

अल्पउत्पन्न घटक..

  • ज्यांचे सरासरी कौटुंबिक मासिक उत्पन्न ५० हजार आहे.
  • अनामत रक्कम २५ हजार.
  • अर्जाचे शुल्क ५ हजार.

लाभ कुणाला?

  • ज्याचे पक्क्या स्वरूपाचे घर नाही.
  • सिडकोच्या अन्य गृहयोजनेचा लाभ घेतला नसावा आणि तसे हमीपत्र देणे बंधनकारक.

चटई क्षेत्रफळ किती?

  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २५.८१ चौरस मीटर.
  • अल्प उत्पन्न गटांसाठी २९.८२ चौरस मीटर.

 

 

रागांची नावे!

या गृहसंकुलांना शास्त्रीय संगीतातील रागांची नावे देण्यात आली आहेत. यात तळोजा येथे आसावरी (सेक्टर २७), केदार (सेक्टर २१), मारवा (सेक्टर २२), धनश्री (सेक्टर २९), खारघर येथे बागेश्री (सेक्टर ४०), कळंबोली येथे  हंसध्वनी (सेक्टर १५), घणसोली येथे सेक्टर १० मध्ये मालकंस (भूखंड क्रमांक १), मेघमल्हार (भूखंड क्रमांक २), द्रोणागिरी येथे मल्हार (सेक्टर ११), भूपाळी (सेक्टर १२, भूखंड ६३) आणि भैरवी (सेक्टर १२, भूखंड ६८) या गृहसंकुलांचा समावेश आहे.