पालघरच्या केळवे समुद्रात चौघे बुडाले, एक मृतदेह सापडला

Palavhar kelave sea 4 drown And One body was found

नालासोपारा येथील सुमारे सात जण येथे फिरायला आले होते. समुद्राला भरती असताना पर्यटक पाण्यात उतरल्याने ही दुर्घटना घडली, असे सांगण्यात येत आहे.

केळवे येथे पर्यटनासाठी आलेले चार पर्यटक सुमद्रात बुडाल्याची घटना आज (रविवार) दुपारी घडली आहे. हे पर्यटक नालासोपारा येथील होते. आज दुपारी दोन-अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बुडालेल्या चौघांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, तिघांचा शोध सुरु आहे.

शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस सुट्या आल्यामुळे येथे पर्यटकांची संख्या वाढली आहे. केळवा पोलीस ठाणे हद्दीतील दादरा पाडा समुद्र किनारी संतोष भुवन नालासोपारा पूर्व येथील गौरव भिकाजी सावंत (वय १७), संकेत सचिन जोगले (१७), देविदास रमेश जाधव (१६), दिपक परशुराम चालचाडी (२०), दिपेश दिलीप पेडणेकर (१७), श्रीतेज नाईक (१५), तुषार चिपटे (१५) ही ७ मुले पर्यटनासाठी आली होती.

दुपारी अडीचच्या सुमारास हे सर्वजण समुद्रात पोहण्यासाठी गेले.  यातील चार जण बुडाले. यातील दिपक चालवाडीचा मृतदेह सापडला आहे. तर दिपेश पेडणेकर, श्रीतेज नाईक आणि तुषार चिपटे यांना शोधण्याचे काम सुरू आहे. पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत.