खासगी व्हॉट्सअ‍ॅप समूहांत आता पोलिसांचा शिरकाव

Police Involvement Now In Private WhoseSwap Group

प्रत्येक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याचे जास्तीत जास्त खासगी व्हॉट्सअ‍ॅप समूहांमध्ये अस्तित्व असेल.

महा न्यूज नेटवर्क मुंबई :- धुळे, मालेगाव येथील घटनांनंतर समाजमाध्यमांवरून क्षणात फोफावणाऱ्या, जीवावर बेतणाऱ्या अफवांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी अनोखी व्यूहरचना आखली आहे. प्रत्येक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याचे जास्तीत जास्त खासगी व्हॉट्सअ‍ॅप समूहांमध्ये अस्तित्व असेल. या समूहांमध्ये दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारी, खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती येऊन धडकल्यास ती अन्य समूहांमध्ये जाण्यापासून रोखेल. हा धोरणात्मक निर्णय नसला तरी वरिष्ठ पातळीवरून सर्व पोलीसप्रमुखांना खासगी व्हॉट्सअ‍ॅप समूहांमध्ये अस्तित्व निर्माण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मूल चोरणारी टोळी या अफवेवरून धुळ्यात पाच जणांची हत्या केली गेली. या प्रसंगाची पुनरावृत्ती मालेगावमध्ये होता होता राहिली. या आणि अशा अन्य अफवा रोखण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती राज्य पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकसत्ताला दिली. या अफवा, दिशाभूल करणारी माहिती, महापुरुषांची बदनामी करणारा किंवा दोन समाजात तेढ निर्माण करेल असा मजकूर, छायाचित्र, चित्र फेसबूक, ट्विटर या माध्यमांवरून काढून टाकणे शक्य आहे. मात्र व्हॉट्सअ‍ॅपवरून दोन व्यक्तींमध्ये किंवा समूहात होणारा संवाद रोखणे, मध्यस्थी करणे पोलिसांच्या हाती नाही. त्यामुळे सध्या व्हॉट्सअ‍ॅप समूहांवर पोलिसांनी जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले आहे.