… तर मोदींऐवजी प्रणव मुखर्जी होणार पंतप्रधान; RSS ची पर्यायी रणनीती

Pranab Mukherjee will be PM instead of Modi; RSS alternative strategies

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ऐनवेळी पंतप्रधानपदासाठी प्रणव मुखर्जी  यांचे नाव पुढे करेल. जेणेकरून त्यांना सत्ता कायम राखता येईल. संघाने यादृष्टीने जुळवाजुळव सुरूही केली आहे, असा सनसनाटी दावा शिवसेना खासदार संजय राउत  यांनी केला.

‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, आमच्या अंदाजानुसार RSS ने  गरज पडल्यास तर प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान करण्याची सर्व तयारी केली आहे. जर आगामी निवडणुकीत सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाला अपेक्षित संख्याबळ जमवता आले नाही तर संघाकडून पंतप्रधानपदासाठी प्रणव मुखर्जींचे नाव पुढे केले जाईल. जेणेकरून त्यांना सत्ता कायम राखता येईल. मात्र, यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपाला 110 जागा गमवाव्या लागतील, असे भाकीतही राऊत यांनी वर्तवले. संजय राऊत यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

यंदा नागपुरात झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोप कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावरून काँग्रेससह विरोधी पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. एकेकाळी काँग्रेसचे दिग्गज नेते राहिलेले मुखर्जी संघाच्या कार्यक्रमात येणार असल्याचे निश्चित झाल्यामुळे संपूर्ण देशाच्या राजकारणाचे लक्ष या कार्यक्रमाकडे होते.