लव्ह जिहाद : नेमबाज तारा शाहदेवला रकिबुल हसनकडून घटस्फोटाला मंजुरी

Shooter Tara Shahdev approved by divorce lawyer Rakibul Hasan

लग्नापूर्वी आपल्याला खोटी माहिती देण्यात आल्याचा आरोप ताराने केला होता. त्यानंतर आपल्याबरोबर शारिरीक आणि घरगुती शोषण झाल्याचेही ताराने याचिकेत म्हटले होते.

राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज तारा शाहदेवला तिचा पती रकीबुल हसन ऊर्फ रंजितसिंह कोहलीकडून घटस्फोटासाठी रांचीच्या कुटुंब न्यायालयाने परवानगी दिली आहे. ताराने गेल्या वर्षी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. यासाठी दोघांनीही कोर्टासमोर हजेरी लावली होती. मुख्य न्यायाधीश ब्रिजेशकुमार गौतम यांनी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर घटस्फोटाला मंजुरी दिली.

तारा शाहदेव आणि रकिबुल हसन यांनी ६ जुलै २०१४ मध्ये लग्न केले होते. मात्र, लग्नापूर्वी आपल्याला खोटी माहिती देण्यात आल्याचा आरोप ताराने केला होता. त्यानंतर आपल्याबरोबर शारिरीक आणि घरगुती शोषण झाल्याचेही ताराने याचिकेत म्हटले होते. ताराचे वकील एलसीएन शाहदेव यांनी सांगितले की, लग्नानंतर ७ जुलै २०१४ रोजी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी ताराला धर्मांतरासाठी मारहाण आणि दबाव टाकायला सुरुवात झाली. तारासोबत अत्याचार करण्यात आला तसेच तिचे मुस्लिम रितीरिवाजांप्रमाणे पुन्हा लग्न लावण्याचा प्रयत्न झाला. यानंतर पोलिसांच्या मदतीने याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला. ६ जानेवारी २०१७ रोजी कोर्टात घटस्फोटासाठी याचिका दाखल करण्यात आली.

दरम्यान, या खटल्यात कोर्टाने घटस्फोटाला मंजूरी दिल्यानंतर तारा म्हणाली की, मला इतरही अनेक बाबींमध्ये न्याय हवा आहे. याप्रकरणी सीबीआयने खटला दाखल केला आहे. यामध्ये न्यायासाठी मला बराच काळ वाट पहावी लागेल. मात्र, न्याय मिळेल अशी आशा आहे. हे नातं संपुष्टात आल्यानंतर मला माझ्या करियरवर लक्ष केंद्रीय करता येईल, असेही तिने म्हटले आहे.