धक्कादायक! पुण्यात आळंदीमध्ये ११ महिन्याच्या मुलाने गिळला रिमोटचा सेल

पुण्यातील आळंदी येथे अकरा महिन्याच्या मुलाने रिमोटचे सेल गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हुजैफ तांबोळी असे या मुलाचे नाव आहे.

पुण्यातील आळंदी येथे अकरा महिन्याच्या मुलाने रिमोटचा सेल गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हुजैफ तांबोळी असे या मुलाचे नाव आहे. शनिवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास ही घटना घडली. हुजैफला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

तांबोळी कुटुंब आळंदी येथे राहते. आज सकाळी हुजैफ कुटुंबियांच्या आधी जागा झाला व खेळता खेळता टेबलावर ठेवलेला रिमोट त्याने उचलला. काही वेळाने त्याने तो रिमोट जमिनीवर आपटला. त्या आवाजाने सगळे जागे झाले. हुजैफने त्यानंतर कुटुंबियांचे लक्ष नसताना जमिनीवर पडलेला सेल उचलला व पटकन गिळून टाकला.

हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात येताच त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. आता दुर्बिणीच्या साह्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन तो सेल बाहेर काढण्यात येणार आहे.