मुलाने पाजले आई – वडिलांना नारळपाण्यातून विष .

उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू, आई अत्यवस्थ असल्याची माहिती समोर आली आहे

The boy gave the parents the coconut poison.

महा न्यूज नेटवर्क – लातूर : मुलगा म्हणजे वंशाचा दिवा! अशी म्हण प्रसिद्ध आहे. मात्र लातुरमध्ये मालमत्तेच्या वादातून मुलाने आई वडिलांना नारळ पाण्यातून विष देऊन ठार करण्याचा प्रयत्न केला. हे नारळ पाणी पिऊन या मुलाच्या आई वडिलांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला तर आई अत्यवस्थ आहे असे समजते आहे. साधुराम कोटंबे असे या मुलाच्या वडिलांचे नाव आहे तर गयाबाई असे आईचे नाव आहे. लातूर शहरातील मोरेनगर भागात ही घटना घडली.

नेमके काय घडले?
साधुराम कोटंबे आणि गयाबाई हे १३ जूनला मोरेनगर भागात असलेल्या घराच्या अंगणात रात्री ९ च्या सुमारास बसले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा ज्ञानदीप कोटंबे याने त्याच्या आई वडिलांना नारळ पाणी दिले. नारळ पाणी कडवट का लागते आहे? असे या दोघांनी मुलाला विचारले. मात्र नारळ पाणी कडवटच असते असे मुलाने आई वडिलांना सांगितले. साधुराम कोटंबे यांनी नारळ पाणी संपवले.

मात्र गयाबाई यांनी दोन घोट नारळपाणी पिऊन शहाळे तसेच ठेवून दिले. काही वेळाने साधुराम कोटंबे आणि गयाबाई या दोघांनाही अस्वस्थ वाटू लागले. या दोघांनाही लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान साधुराम कोटंबे यांचा १४ जूनच्या रात्री मृत्यू झाला.

गयाबाई कोटंबे यांनी पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबावरून ज्ञानदीप कोटंबे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ज्ञानदीपने आई वडिलांकडे प्लॉट, घर आणि मालमत्तेची वाटणी मागितली होती. मात्र त्यांनी त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. असे असूनही तो आई वडिलांकडे तगादा लावत होता. आई वडिल ऐकत नाहीत हे समजल्यावर त्याने या दोघांनाही नारळपाण्यातून विष दिले. यामध्ये त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला.