बांदीपोरा सेक्टरमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद

The encounter in Bandipora sector, two militants, one jawan martyr

श्रीनगर:-बांदीपोरा सेक्टरमधील पनयारच्या जंगलात गुरुवारी पहाटे झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. एका भारतीय जवानाला यावेळी वीरमरण आले. गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात शोध मोहीम सुरु आहे. अखेर आज पहाटे भारतीय सैन्य आणि दहशतवादी आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार करण्यात आला. यात भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना टिपले. तर एक जवान शहीद झाला आहे. दरम्यान, पनारच्या जंगलात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर १४ राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी जंगलात शोध मोहीम हाती घेतली होती.

तत्पूर्वी काल शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरावर हल्ला केला होता. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात संबंधित पोलीस अधिकाऱ्यासह त्याची बहीण जखमी झाली होती. या दोघांनाही श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर भारतीय लष्कराने हा परिसर खाली करून शोध मोहीमेला सुरुवात केली होती.