मोबाईलच्या स्फोटात कंपनीच्या सीईओचा मृत्यू

कोणत्या मोबाईलने स्फोट घेतला हे अद्याप कळू शकले नाही.   

नवी दिल्ली :- मोबाईल फोनचा स्फोट होऊन एका कंपनीच्या सीईओचा मृत्यू झाला आहे. ही घटना मलेशियामध्ये घडली आहे. नाजरीन हसन असं मृत्यू झालेल्या सीईओचं नाव आहे. नाजरीन हसन मलेशियातील क्रॅडल फंड या कंपनीत सीईओ पदावर कार्यरत होते.
मोबाईलचा स्फोट झाल्यानंतर घरातील गाद्यांनी आणि कापडी वस्तूंनीही पेट घेतला. नाजरीन हसन यांच्याकडे ब्लॅकबेरी आणि हुवेई असे दोन मोबाईल होते. त्यामधील कोणत्या मोबाईलने स्फोट घेतला हे अद्याप कळू शकले नाही.

मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे लागलेल्या आगीमुले हसन यांचा मृत्यू झाला नाही तर स्फोटामळे झाला आहे असा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. स्फोटामुळे मोबाईलचे बारीक तुकडे हसनच्या डोक्यात आणि शरीराच्या इतर भागात घुसल्याने ते गंभीर जखमी झाले आणि मृत्यू झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.

या घटनेचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मते हसन यांच्या मृत्यूचं कारण वेगळं आहे. पोलिसांच्या मते मोबाईलचा स्फोट झाल्यानंतर आगीमुळे झालेल्या धुरामुळे श्वास कोंडल्याने त्यांचा मृत्यू झाला. मात्र हसन यांच्या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल फोनच्या स्फोटनंतर झालेल्या दुखापतीतं हसन यांचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात समोर आलं आहे.