राज्याचा आगामी मुख्यमंत्री भाजपा-शिवसेनेने एकत्र येऊन ठरवावा : चंद्रकांत पाटील

राज्याचा आगामी मुख्यमंत्री कोण असावा, हे भाजप-शिवसेनेने एकत्रित येऊन ठरवावे. दोघांच्या दुहीचा फायदा काँग्रेसला होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. 

The next Chief Minister of the state, BJP-Shiv Sena should come together and decide

राज्याचा आगामी मुख्यमंत्री कोण असावा, हे भाजप-शिवसेनेने एकत्रित येऊन ठरवावे. दोघांच्या दुहीचा फायदा काँग्रेसला होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

शिवसेनेच्या काल झालेल्या वर्धापन दिन मेळाव्यात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचा पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, अशी घोषणा करून शिवसैनिकांना सत्ता आणण्यासाठी सज्ज राहण्यासा सांगितले होते. यावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, आपला मुख्यमंत्री व्हावा असे प्रत्येकालाच वाटते. त्याचप्रमाणे सन २०१९ मध्ये भाजपाचा मुख्यमंत्री होईल असे आम्हाला वाटते. खरे तर राज्याचा मुख्यमंत्री कोण असावा हे भाजपा-शिवसेनेने एकत्रित येऊन ठरवले पाहिजे. शिवसेनेने त्यांचा मुख्यमंत्री होणार असा दावा करायचा दुसरीकडे आम्ही आमचा मुख्यमंत्री होणार असे म्हणायचे. यातून मतांविभाजन होऊन काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होऊ नये हीच आमची इच्छा आहे.

…तर राष्ट्रवादीचे हसे होईल

राज्याच्या विकासात अतुलनिय योगदान देणारे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री असा पुरस्कार देणारे उपहासात्मक आंदोलन राष्ट्रवादीच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार आहे. या आंदोलनावरून पाटील यांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली देश, राज्य प्रगती करत असल्याचे सर्वजण पाहत आहेत. महाराष्ट्र तर अनेक बाबतीत देशात पुढे आहे. तरीही मुख्यमंत्र्यांना पुरस्कार देणारे आंदोलन राष्ट्रवादी करणार असेल तर त्यांचे जनतेत हसे होईल, असा टोला त्यांनी लगावला.