शरद पवारांचे डोके ठिकाणावर आहे का?- उद्धव ठाकरे .

Uddhav Thackeray Criticized Sharad Pawar On His Pagdi Statement

महा न्यूज नेटवर्क : पगडीवरून राजकारण करणाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली आहे. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पगडी प्रकरणावरून भाष्य केले होते. पुण्यात आलो की पुणेरी पगडी नको फुले पगडी घालून स्वागत करा असे आदेशच त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिले होते. या वक्तव्यावरून टिका झाल्यावर मात्र शरद पवार यांनी त्याबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र हाच मुद्दा पुढे करत त्यांनी शरद पवारांवर टीका केली.

आजच्या घडीला आपण महात्मा फुले, लोकमान्य टिळक यांच्या पगडीचे राजकारण करतो आहोत. मात्र ते करणाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारत त्यांनी शरद पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. आपण टिळक, महात्मा फुले यांचे कार्य विसरतो आहोत आणि त्यांच्या पगडीवरून राजकारण करण्यात धन्यता मानतो आहोत असाही टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.आचार्य अत्रे पुरस्कार सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला आहे, त्या कार्यक्रमात त्यांनी ही टीका केली.

पत्रकार म्हटले की टिळक, आगरकर यांचा उल्लेख येणारच. लोकमान्य टिळक, महात्मा फुले यांचे कार्य प्रचंड आहे. आपण ते सोयीस्करपणे विसरतो आणि त्यांच्या पगड्या घालून आपण महात्मा होण्याचा प्रयत्न करतो. लोकमान्य टिळकांनी इंग्रजांना विचारले होते सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हाच प्रश्न पगडी घालून मिरवणाऱ्यांना आणि त्याचे राजकारण करण्यांना विचारला पाहिजे की तुमचे डोके ठिकाणावर आहे का? ठिकाणावर सोडून द्या, डोके आहे का? असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

एवढेच नाही तर हिंमत असेल तर टिळक, महात्मा फुले यांच्या कतृत्त्वाची उंची गाठून दाखवा, असे आव्हानही उद्धव ठाकरेंनी दिले. लोकमान्य टिळक म्हटले होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. पण आजच्या घडीला हा विचार करायला हवा की लोकमान्य टिळकांना जे स्वराज्य अपेक्षित होते ते स्वराज्य आहे का? देशात दुसरी आणीबाणी आली अशी कुजबूज होताना दिसते आहे. एक काळ असा होता की मीडिया सरकारवर लक्ष ठेवायचा. आता काळ असा आहे की सरकार मीडियावर लक्ष ठेवताना दिसते आहे.