बंदीनंतर संकलित प्लास्टिकचे करायचे काय?

What is the compilation plastic after the ban?

प्रक्रिया केली जाणार असल्याचा प्रशासनाचा दावा; रस्त्यासाठीही उपयोग होणार

माह न्यूज नेटवर्क :-प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाल्यामुळे महापालिका प्रशासनाकडे जप्त केलेले प्लास्टिक मोठय़ा प्रमाणावर येण्यास सुरुवात झाली आहे. या जप्त प्लास्टिकचे बारीक बारीक तुकडे करून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी जप्त प्लास्टिकचे प्रमाण पाहता प्लास्टिकचे करायचे काय, असाच प्रश्न प्रशासनापुढे निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

पर्यावरणाची हानी होत असल्यामुळे प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी राज्य शासनाने घेतला. प्लास्टिकचा वापर, विक्री आणि उत्पादनावर राज्य शासनाने या निर्णयानुसार बंदी घातली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शनिवारपासून (२३ जून) सुरू झाली आहे. प्लास्टिकचा वापर आणि विक्री करणाऱ्यांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येत असून कारवाईचा धडाका घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि भरारी पथकाकडून सुरू झाला आहे.

शनिवारी आणि सोमवारी महापालिका प्रशासनाकडून पंधरा क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यामातून प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. शनिवारी तब्बल आठ हजार किलो तर सोमवारी सात हजार किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

या दोन दिवसांमध्येच पंधरा हजार किलो प्लास्टिक प्रशासनाकडे जमा झाले आहे. यात प्लास्टिक आणि थर्माकोलच्या विविध प्रकारच्या वस्तूंचा समावेश आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये मोठय़ा संख्यने प्लास्टिक जप्त होणार, हे स्पष्ट आहे.