72 तासात कारवाई केली नाही, तर स्वतः सूड घेईन’, शहीद जवानाच्या वडिलांचा सरकारला अल्टिमेटम

दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करायला भारत सरकारला कोण थांबवत आहे?

Who is stopping the Government of India to take strong action against terrorists
श्रीनगर:- जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या भारतीय लष्करातील जवान औरंगजेब यांच्या वडिलांनी सरकारला 72 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. 72 तासात कारवाई केली नाही, तर स्वतः सूड घेणार असल्याचं शहीद जवान औरंगजेब यांच्या वडिलांनी म्हटलं आहे. पत्रकारांशी बोलताना औरंगजेब यांचे वडील म्हणाले,’माझ्या मुलाला मारलेल्या दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करायला भारत सरकारला कोण थांबवत आहे? जर सरकारने पुढच्या 72 तासात कारवाई केली नाही, तर मी स्वतः औरंगजेबच्या हत्येचा बदला घेईन, असं ते म्हणाले.

शहीद जवान औरंगजेब यांच्या वडिलांनी औरंगजेब यांच्या मृत्यूनंतर त्या प्रकरणावर राजकारण करणाऱ्या नेत्यांवरही सडकून टीका केली आहे. औरंगजेब यांचं निधन हे परिवाराबरोबरच भारतीय लष्करासाठीही मोठा झटका आहे, असंही ते म्हणाले.

जम्मू-काश्मीरच्या पूँछ सेक्टरमध्ये राहणारे जवान औरंगजेब 23 राष्ट्रीय रायफलमध्ये तैनात होते. सुट्टीसाठी ते घरी आले असताना त्यांचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर गुरूवारी (ता.14 जून) रोजी पुलवाला जिल्ह्यातील गुसु गावात त्यांचा मृतदेह सापडला. औरंगजेब यांच्या परिवारातील अनेकांनी सैन्यातून देशाची सेवा केली आहे. त्याचे वडील आणि काकाही सैन्यात होते. औरंगजेब यांच्या काकाला वीरमरण आलं. औरंगजेब यांचा भाऊसुद्धा सैन्यात आहेत.