लग्नासाठी दबाव टाकायला त्याने तिच्या चार वर्षाच्या मुलाला पळवलं

महिला दबावाखाली येऊन लग्नाचा प्रस्ताव स्वीकारेल

नवी दिल्ली- महिला लग्नासाठी तयार नसल्याने तिच्यावर दबाव टाकण्यासाठी एका व्यक्तीने त्या महिलेच्या चार वर्षाच्या मुलाचं अपहरण केल्याची घटना पूर्वी दिल्लीमध्ये घडली आहे. महिला दबावाखाली येऊन लग्नाचा प्रस्ताव स्वीकारेल म्हणून त्याने तिच्या मुलाचं अपहरण केलं.  पूर्व दिल्लीतील मधू विहार येथे रविवारी ही घटना घडली. १६ जूनला महिलेने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मुलाच्या अपहरणाची तक्रार नोंदवली. शिवकुमार असं मुलाचं अपहरण करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. शिवकुमार मुलाला घेऊन कोलकाता जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर त्यांना मुलगा आणि आरोपी कनॉट प्लेस येथे असल्याचे समजले. त्यांनी शिवकुमारला अटक करुन मुलाची सुटका केली. शिवकुमारला तक्रारदार महिलेसोबत लग्न करायचं होतं पण ती लग्नाला तयार होत नसल्याने दबाव आणण्यासाठी आपण तिच्या मुलाचे अपहरण केल्याची कबुली शिवकुमारने पोलीस चौकशीत दिली आहे.

शिवकुमार व मुलाची आई मित्र-मैत्रिणी आहेत. मुलाच्या आईने शिवकुमारने मुलाचं अपहरण केल्याची तक्रार केली. ‘शिवकुमार ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी आली होता. त्यावेळी मी घरी नव्हते. याचा फायदा घेत तो मुलाला घेऊन फरार झाला. घरी परतल्यावर मी मुलाला शोधायला सुरूवात केली. तेव्हा शिवकुमार मुलाला घेऊन गेल्याचं मला समजलं, असं मुलाच्या आईने पोलिसांना सांगितलं.